नियोजित काश्मीर दौरे रद्द   

पुण्यातील पर्यटन कंपन्यांचा निर्णय; काश्मीर पर्यटनाला मोठा फटका 

पुणे : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पुण्यातून काश्मीरसाठी नियोजित असणारे पर्यटन दौरे रद्द करण्याचा निर्णय पुण्यातील पर्यटन दौरे आयोजित करणार्‍यांना कंपन्या आणि संस्थांनी घेतला आहे. याचा मोठा फटका काश्मीर येथील अर्थव्यवस्थेला बसणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.मार्च, एप्रिल, मे आणि जून हे चार महिने काश्मीरचा पर्यटन व्यवसाय जोरात असतो. दरवर्षी या हंगामात पुणे शहर आणि परिसरातून २० ते २५ हजार पर्यटक काश्मीरला जातात. अलीकडच्या काळात या पर्यटकांच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यटकांचा आकडा आता ३० हजारापेक्षा अधिक आहे. सद्य:स्थितीत निम्माच हंगाम झाला आहे. 
 
येत्या १ मे पासून शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या लागणार आहेत. त्यामुळे मे आणि जून महिन्यांत मोठ्या प्रमाणात काश्मीर दौरे नियोजित आहेत. मात्र या आठवड्यातील बहुतांश पर्यटन दौरे रद्द करण्यात आले आहेत. काश्मीर येथील परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढील पर्यटन दौर्‍याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पर्यटन दौरे आयोजित करणार्‍या संस्था व कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे. 
 
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच अनेकांनी नियोजित पर्यटन दौरे रद्द करण्याची मागणी सुरू केली आहे. मागील २४ तासात पुण्यातून आयोजित करण्यात आलेल्या एकूण दौर्‍यांपैकी सुमारे २५ पर्यटकांनी काश्मीर पर्यटनासाठी नकार दिला असल्याचा अंदाज आहे. हल्ल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असल्यामुळे पर्यटकांत भितीचे वातावरण आहे. तर काही पर्यटक काश्मीर दौरा रद्द करून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसारख्या सुरक्षित पर्यटन स्थळाची माहिती विचारत आहेत. कलम ३७० रद्द केल्यानंतर आणि कोरोनानंतरच्या काळात काश्मीर पर्यटन वाढले होते. २०२४ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये २.३५ कोटी पर्यटक आले होते. एप्रिल-मे दरम्यान हॉटेल्स, हाऊसबोट्स आणि गेस्ट हाऊस पूर्णपणे आरक्षित झाले होते. श्रीनगरला जाणार्‍या विमानांच्या तिकीट आरक्षणामध्येही ५० ते १०० टक्के वाढ झाली होती. मात्र आता दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरच्या पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का धक्का बसला आहे. काश्मीरचे पर्यटन वाढण्यासाठी आता आणखी काही काळाची वाट पहावी लागणार आहे.

परिस्थितीचा अंदाज घेऊनच सहलीचे नियोजन

एप्रिल महिन्यात मी पुण्यातून काश्मीरसाठी दोन सहलीचे आयोजन केले होते. त्यातील एक सहल १५ तारखेला संपली दुसर्‍या सहलीसाठी आम्ही काश्मीरला पोहलो. नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे आम्ही पहलगामचे नियोजन रद्द केले. आणि थेट श्रीनगरला पोहचलो. श्रीनगरमध्येच असतानाच हल्ल्याची बातमी मिळाली. त्यामुळे आम्ही आता दिल्लीकडे निघालो आहोत. यापुढे परिस्थितीचा अंदाज घेऊनच काश्मीरच्या सहलीचे नियोजन करणार आहोत. 

- महेंद्र साहु, पर्यटन सहल आयोजक, धनकवडी.

काश्मीर पर्यटनात पुण्याचा वाटा मोठा 

दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या पर्यटनावर नक्कीच परिणाम होणार आहे. दरवर्षी या हंगामात देशभरातून १.५ कोटी पर्यटक काश्मीरला जातात. त्यातील ७० टक्के पर्यटक मार्च, एप्रिल, मे, जून महिन्यात जातात. आपण तेथे न जाण्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेला फटका बसतो. पुण्यातून २० ते २५ हजार पर्यटक काश्मीरला जातात. गेल्या काही वर्षात या संख्येत वाढ झाली आहे. पर्यटकांनी काश्मीरमध्ये येऊ नये, अशीच दहतवाद्यांची इच्छा आहे. 

- नितीन शास्त्री, ज्येष्ठ पर्यटक अभ्यासक. 

पर्यटकांकडून स्थळ बदलण्याची मागणी

दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर पर्यटनासाठी पर्यटकांनी केलेले आरक्षण  वेगाने रद्द केले जात आहे. श्रीनगर आणि गुलमर्गला जाणारे सुमारे ३० ते ४० टक्के पर्यटकांनी पर्यटन स्थळ बदलण्याची मागणी केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, विमान कंपन्या आणि हॉटेल्स सर्व पर्यटकांना पूर्ण परतफेड करत आहेत. यामुळे पर्यटकांना प्रवास पुढे ढकलण्यात किंवा त्यांचे डेस्टिनेशन बदलण्यात फारशी अडचण येत नाही.

- राजीव मेहरा, अध्यक्ष, इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे.

 

Related Articles